राज्यातील स्काऊट गाईडसनी व्यसन मुक्तीसाठी मोठे अभियान राबवावे : राज्यपाल रमेश बैस
मुंबई। राज्यपाल रमेश बैस यांचे आज महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईड संस्थेचे मुख्य आश्रयदाते म्हणून पदग्रहण झाले. राजभवन येथे राज्याचे क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री तसेच महाराष्ट्र राज्य भारत स्काऊट आणि गाईडचे अध्यक्ष संजय बनसोडे यांच्या उपस्थितीत झालेल्या पदग्रहण सोहळ्यात स्काऊट गाईडचे राज्य मुख्य आयुक्त तथा आयुक्त क्रीडा व युवक सेवा डॉ सुहास दिवसे यांनी राज्यपालांना स्काऊट गाईड प्रतिज्ञा दिली.
यावेळी मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते राज्यपालांना स्काऊट स्कार्फ तसेच आश्रयदाते पदक प्रदान करण्यात आले. स्काऊट स्कार्फ परिधान केल्याने व्यक्तीला नम्रतेची आणि कर्तव्याची जाणीव होते. देशातील ४७ लाख स्काऊट – गाईडपैकी १३ लाख सदस्य एकट्या महाराष्ट्राचे आहेत ही अभिमानाची बाब असल्याचे नमूद करून राज्यात स्काऊट आणि गाईडसनी युवकांमध्ये व्यसन मुक्तीसाठी मोठे अभियान राबवावे, तसेच प्रत्येक स्काऊट व गाईडने एकतरी वृक्षाची लागवड करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.
स्काऊट्स व गाईड्सनी स्वच्छ भारत अभियान राबविण्यात तसेच कोविड महामारी काळात चांगले काम केल्याचे नमूद करून शाळा महाविद्यालयांनी स्काऊट गाईडचे काम गांभीर्यपूर्वक करावे अशी सूचना राज्यपालांनी यावेळी केली.
आयुक्त डॉ सुहास दिवसे यांनी स्काऊट गाईड चळवळीचा इतिहास सांगितला. स्काऊट चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे चारित्र्य घडवले जाते तसेच विश्वबंधुत्व भावनेचे संवर्धन केले जाते, असे त्यांनी सांगितले. महाराष्ट्र स्काऊटच्या राज्य चिटणीस सारिका बांगडकर यांनी आभार प्रदर्शन केले. तर कार्यक्रमाचे संचलन सहाय्यक राज्य प्रशिक्षण आयुक्त स्काऊट गोविंद केंद्रे यांनी केले..