
नांदेड| भारतीय जनता पक्षाची राज्यात विक्रमी सभासद नोंदणी व्हावी यासाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी कंबर कसली असून त्याचाच एक भाग म्हणून नांदेड येथे दि.14 फेब्रुवारी रोजी नांदेडसह परभणी, लातूर, हिंगोली या चार जिल्ह्यांची संघटनपर्व अंतर्गत विभागीय कार्यशाळा आयोजित केली आहे.
दि.14 रोजी सकाळी 10 वाजता या कार्यशाळेस सुरुवात होणार आहे. तत्पूर्वी सकाळी 8.30 पासून सांगवी चौक, चैतन्यनगर शिवमंदिर, राज कॉर्नर, शेतकरी पुतळा चौक, भावसार चौक या ठिकाणी येणाऱ्या मान्यवरांचे जंगी स्वागत करण्यात येणार आहे. दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारुढ पुतळ्यास भाजप नेते पुष्पमाला अर्पण करून अभिवादन करणार आहेत.
येथील भक्ती लॉन्समध्ये होणाऱ्या या कार्यशाळेस भाजपाचे प्रदेशाध्यक्ष तथा राज्याचे महसूल मंत्री ना.चंद्रशेखर बावनकुळे, कार्यकारी अध्यक्ष आ.रविंद्र चव्हाण, पालकमंत्री ना.अतूल सावे, परभणीच्या पालकमंत्री ना.मेघनाताई बोर्डीकर, राज्याचे माजी मुख्यमंत्री खा.अशोकराव चव्हाण, विभागीय संघटन मंत्री संजय कौडगे, प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे, संजय केनेकर, आ.विक्रांत पाटील, प्रदेश सचिव किरण पाटील, आ.तुषार राठोड, आ.भीमराव केराम, आ.संभाजी पाटील निलंगेकर, आ.तानाजी मुटकुळे, आ.राजेश पवार, आ.श्रीजयाताई चव्हाण, आ.जितेश अंतापूरकर, आ.अभिमन्यू पवार, आ.रमेशअप्पा कराड यांच्यासह चारही जिल्ह्यातील जिल्हाध्यक्ष यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे.
या कार्यशाळेमध्ये भारतीय जनता पक्षातर्फे सुरु करण्यात आलेल्या ऑनलाईन व ऑफलाईन सभासद नोंदणीचा आढावा घेतांनाच पक्ष वाढीसाठी पदाधिकारी व कार्यकर्त्यांची भूमिका त्यासोबतच राज्यातील सामान्य जनतेसाठी महायुतीने सुरु केलेल्या कल्याणकारी योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या कार्यशाळेला मोठे महत्व प्राप्त झाले आहे.
चार जिल्ह्याची होणारी ही कार्यशाळा अधिक यशस्वी व्हावी यासाठी भारतीय जनता पक्षाचे स्थानिक पदाधिकारी अहोरात्र काम करीत आहेत. संपूर्ण शहर भाजपमय झाले असून शहराच्या विविध भागात बॅनर, मोठमोठे कटआऊट्स व पक्षाचे झेंडे मोठ्या प्रमाणात दिसत आहेत. या कार्यशाळेस फक्त निमंत्रीतांनी सकाळी 8.30 वाजता भक्ती लॉन्स याठिकाणी उपस्थित रहावे असे आवाहन या कार्यशाळेचे संयोजक महानगर कार्यकारी अध्यक्ष माजी आ.अमरनाथ राजूरकर यांच्यासह जिल्हाध्यक्ष डॉ.संतुक हंबर्डे, जिल्हाध्यक्ष किशोर देशमुख यांनी केले आहे.
