लकडोबा हनुमान मंदिरात यावर्षीपासून काकडा आरतीला सुरुवात; महिलांचा प्रतिसाद
हिमायतनगर| शहरातील लकडोबा चौकात असलेल्या लकडोबा हनुमान मंदिरात वारकरी सांप्रदायिक महिला मंडळाच्या पुढाकारातून यावर्षीपासून काकडा आरतीच्या प्रथेला सुरुवात करण्यात आली आहे. सकाळच्या प्रहरी होणाऱ्या आरतीला शेकडोच्या संख्येने महिला मंडळी उपस्थित होत असल्याने दिवाळीच्या पर्वामध्ये भक्तीमय वातावरण निर्माण झाले आहे.
सकाळच्या रामप्रहरी म्हणजे चार वाजता अभ्यंगस्नान करून घरासमोर सडा – सारवन आणि रांगोळी काढून महिला मंडळी परिसरातील लकडोबा चौकात असलेल्या गदाधारी हनुमान मंदिर सभागृहात एकत्र होतात. या ठिकाणी विठ्ठल रुक्माईच्या मूर्तीची पूजन करून पाच वाजता काकडा आरतीला सुरुवात केली जाते. विविध प्रकारचे धार्मिक गीते, आरती म्हणत शेवटी काकडा आरती केली जाते. त्यानंतर पसायदान घेत काकडा आरतीच्या समारोप केला जातो. तसेच महिला मंडळींकडून विठ्ठल रुख्माई तसेच अन्य धार्मिक गीतावर फुगडी खेळत जणू काही वारीचा गेल्याचा आनंद घेतात.
कोजागिरी पौर्णिमेपासून सुरुवात करण्यात आलेल्या काकडा आरतीला मोठ्या प्रमाणात महिलांची गर्दी होताना दिसून येत आहे. त्यामुळे परिसरात भक्तीमय वातावरण निर्माण झाले असून, यंदापासून सुरू झालेल्या काकडा आरतीच्या उपक्रमात परिसरातील महिलांचा मोठ्या प्रतिसाद मिळत आहे. या काकडा आरतीला जास्तीत जास्त महिला मंडळींनी उपस्थित होऊन पुण्य पदरी पाडून घ्यावे असे आवाहन लकडोबा हनुमान मंदिर कमिटीच्या वतीने करण्यात आले आहे.