राजकियहिंगोली

हिंगोली लोकसभा मतदार संघात अंदाजे 62.67 टक्के मतदान

हिंगोली| हिंगोली लोकसभा मतदार संघात 33 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज मतदारसंघात 2008 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. 18 व्या लोकसभा निवडणुकीत आज अंदाजे 62.67 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील वसमत विधानसभा मतदार संघ 60, हदगाव 66, हिंगोली 60, कळमनुरी 63, किनवट 65 आणि उमरखेड विधानसभा मतदार संघात अंदाजे 62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली लोकसभा मतदारसंघात एकूण 18 लाख 77 हजार 734 मतदार असून, त्यामध्ये 9 लाख 46 हजार 674 पुरुष तर 8 लाख 71 हजार 35 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 25 मतदारांचा यात समावेश आहे.

निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती एम. एस. अर्चना, निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली, कमलदीप सिंह, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्रीमती आर. जयंथी यांनी हिंगोली लोकसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परीश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने लोकसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले.

जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर हे दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 1026 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. संपूर्ण लोकसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी सतत मार्गदर्शन केले. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी (रोहयो) गणेश महाडीक, उपजिल्हाधिकारी समाधान घुटूकडे यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तत्पूर्वी निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनीही वॉर रूमला भेट देऊन निवडणूक प्रक्रियेची माहिती घेतली.

मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली लोकसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 7, दिव्यांग कर्मचारी संचलित 6 व युवा मतदान केंद्र-6 असे एकूण 19 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी श्री.पापळकर यांनी दिली आहे.
या सर्व मतदान केंद्रावर उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे सावलीसाठी शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.

मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. मतदान प्रक्रिया (मॉक पोल) सुरू असतानाच 39 मतदान यंत्रात बिघाड झाल्याचे लक्षात येताच जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून तातडीने मतदान यंत्र बदलवून मतदान प्रक्रिया सुरळीत करण्यात आली.

जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र, लोकशाहीचं लग्न असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!