राष्ट्रपतींच्या भेटीने भारावले भावी डॉक्टर्स
छत्रपती संभाजीनगर। छ्त्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान संचालित उपक्रम, सेवांकुर भारतच्या सदस्य व पदाधिकारी यांनी माननीय राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची दिल्लीस्थित राष्ट्रपती भवन येथे सदिच्छा भेट घेतली. यावेळी सेवांकुर भारत राबवित असलेल्या उपक्रमांची माहिती राष्ट्रपतींना देण्यात आली.
वैद्यकीय क्षेत्रात सेवांकुर भारत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने महाराष्ट्र व मध्यप्रदेश मध्ये जो उपक्रम राबवित आहे, हा उपक्रम पूर्ण भारतात सुरू व्हावा अशी इच्छा सेवांकुर भारतचे संयोजक डॉ. नितीन गादेवाड व डॉ बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठानचे कार्यवाह डॉ. अश्विनीकुमार तुपकरी यांनी व्यक्त केली. याप्रसंगी काही वैद्यकीय विद्यार्थ्यांनी, सेवांकूरच्या माध्यमातुन आपल्या विचारात आणि कृतीत झालेल्या सकारात्मक बदलांचे अनुभवकथन केले. यामध्ये मृदुल हिरलेकर (शा.वै. महा, छ.संभाजीनगर), अनुजा पवार (एम आय एम ई आर वै. महा., तळेगांव दाभाड़े) आणि अथर्व ढवळे (शा. दंत वैद्यक महा., मुंबई) यांनी अनुभवकथन केले तर डॉ प्रशांत गायकवाड़, संपर्क प्रमुख सेवांकूर भारत, यांनी सूत्र संचलन केले.
त्यानंतर झालेल्या उद्बोधनात माननीय राष्ट्रपतीजी यांनी जनजाति भागात जाऊन समाजाचे दर्शन घेणे आणि त्याविषयी कृती करणे याचे कौतुक केले. डॉ आंबेडकरांच्या उदाहरणातुन आपण ही समाजाप्रति संवेदनशीलता बाळगावी, असेही त्यांनी नमूद केले. नंतर विद्यार्थी आणि डॉक्टर्स यांच्यासोबत सामूहिक फ़ोटो सेशन माननीय राष्ट्रपति महोदयांनी केले.
काय आहे सेवांकूर भारत उपक्रम?
सेवांकूर भारत वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांच्या सहभागाने सुरू केलेला सेवा उपक्रम आहे. छत्रपती संभाजीनगर येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर वैद्यकीय प्रतिष्ठान या संस्थेमार्फत या उपक्रमाची 1997 मध्ये सुरुवात झाली. वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांमध्ये सामाजिक उत्तरदायित्व, नैतिक वैद्यकीय सेवा व भारतीयत्वाची जाणीव निर्माण करण्यासाठी या उपक्रमाची सुरुवात झाली. या उपक्रमाअंतर्गत आतापर्यंत 250 हून अधिक महाविद्यालये, 10 हजारांहुन अधिक वैद्यकीय विद्यार्थी, 250 हून अधिक भागीदार संस्थानी नोंद केली आहे. या अंतर्गत वन विक फॉर नेशन, व्यक्तित्त्व विकास शिबिर, ग्रामीण वैद्यकीय शिबिरे इ. अनेक उपक्रम घेतले जातात. डॉ हेडगेवार रुग्णालयाचे या उपक्रमासाठी मोठे योगदान राहिले आहे.