नांदेड,अनिल मादसवार। अमृत योजने अंतर्गत हिंगोली लोकसभा मतदार संघातील नांदेडसह किनवट आणि हिमायतनग रेल्वे स्टेशनचा कायापालट होणार आहे. यासाठी केंद्र सरकार कडुन आवश्यक त्या निधीस मंजूरी देण्यात आली आहे. या रेल्वे स्थानकांचे अत्याधुनिकीकरण करण्यात येणार असून, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २६ फेब्रुवारी सोमवारी ऑनलाईन उद्घाटन होणार असल्याची माहिती खासदार हेमंत पाटील यांनी दिली.

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्रीय रेल्वे मंत्रालयाच्या माध्यमातून देशभरातील रेल्वे प्रवाशांना सर्वोत्तम रेल्वे सेवा देता यावी म्हणून रेल्वेचे जाळे विणले जात आहे. महाराष्ट्रात एकूण 34 प्रकल्प मंजूर करण्यात आले आहेत. हा प्रकल्प ५ हजार ७७२ किलोमीटर लांबीचा असून ८० हजार १८४ कोटी रुपयांचा निधी यासाठी केंद्र सरकारने मंजूर केला आहे. शिवाय महाराष्ट्रातील १२६ स्थानके अमृत स्टेशन म्हणून विकसित करण्याचा निर्णय केंद्र सरकारने घेतला होता. यासाठी आवश्यक निधीही मंजूर करण्यात आला आहे.

हिंगोली लोकसभा मतदार संघातील हिमायतनगर आणि किनवट या रेल्वे स्थानकाचा कायापालट होणारा असून यासाठीचा निधी प्राप्त झाला आहे. त्यामुळे अत्याधूनिक सोयी सुविधांसह जिल्हयातील रेल्वे स्थानक तयार करण्यात येणार असल्याची माहिती देताना खासदार हेमंत पाटील म्हणाले की, हुजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकासह हिमायनगर, किनवट या रेल्वे स्थानकाचा समावेश केल्याबद्दल देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले आहेत.

