भोकर। येथील वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने देण्यात येणारा काशीबाई फुलारी स्मृती नारायणी पुरस्कार प्रसिध्द स्त्री रोग तज्ञ आणि सेवाभावी समाजसेविका डॉ. तरू जिंदल यांना देण्यात येणार असल्याची माहिती वरदानंद प्रतिष्ठानच्या वतीने देवीदास फुलारी यांनी दिली.
स्त्रीरोग शास्त्रात एम एस असलेल्या डॉ. तरु जिंदल या विद्यार्थी अवस्थेपासूनच महात्मा गांधींच्या विचाराने प्रभावित झालेल्या होत्या. स्त्रीरोग तज्ञ म्हणून आदिवासी भागांना भेटी देऊन स्त्रियांच्या आरोग्याच्या गरजा आणि समस्या त्यांनी जाणून घेतल्या. आपल्या परिश्रमाला सखोल अभ्यासाची जोड त्यांनी दिली आणि कृतीची पण जोड दिली
यासंदर्भात त्यांनी बिहारच्या आदिवासी भागात केलेले कार्य अधोरेखित करावे असे आहे . या कार्याचे पुढे पुस्तक झालं त्यांनी लिहिलेलं “हा ये मुमकिन है” या पुस्तकाला प्रचंड प्रतिसाद मिळतो आहे. पराकोटीच्या परिश्रमाला प्रतिभा असे म्हणतात. या अर्थानं डॉ. तरू प्रतिभा संपन्न ठरल्या आहेत. रोहन प्रकाशनाने हे पुस्तक काढले असून त्या पुस्तकाचा मराठी अनुवाद पण झालेला आहे.
वरदानंद प्रतिष्ठानने सुरू केलेल्या काशीबाई फुलारी स्मृति नारायणी पुरस्काराच्या डॉ. तरु जिंदल या पहिल्या मानकरी ठरलेल्या आहेत. रोख रक्कम रुपये ५ हजार मानपत्र आणि सन्मानचिन्ह असे स्वरूप असलेल्या या पुरस्काराचे वितरण गोरठा येथे मंगळवार दिनांक २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या चौथ्या मराठी साहित्य संमेलनात मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात येईल.
प्रफुल्ल कुलकर्णी डॉ. रामेश्वर भाले आणि डॉ. माधव विभुते या त्रिसदसीय पुरस्कार समितीने डॉ. तरु जिंदाल यांची निवड केली आहे सदरील पुरस्कारासाठी कुठल्याही प्रकारच्या प्रवेशिका मागितल्या जात नाही पुरस्कार समितीने जो निर्णय घेतला तो अंतिम असतो. या सन्मानाच्या पुरस्कारामुळे डॉ. तरु जिंदल यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे