नांदेड| भविष्यवेधी शिक्षण हे मुलांना 21 व्या शतकातील आव्हान पेलायला लावणारे गुणवत्तापूर्ण शिक्षण असून 31 मार्चपर्यंत जे शिक्षक मुख्याध्यापक एखादा वर्ग किंवा शाळा 100 टक्के असर मूल्यमापनाच्या मानकाची करतील. तसेच दिनांक 1 मे पर्यंत संपूर्ण शाळा असर तर 15 ऑगस्ट स्वातंत्र्य दिनापर्यंत संपूर्ण शाळा न्यासच्या गुणवत्तेची करतील अशा शिक्षक, शाळांना गौरविण्यात येईल, असे प्रतिपादन जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी आज केले.
जिल्ह्यातील जिल्हा परिषद शाळा मधील 825 शिक्षकांची शिक्षण परिषद आज शनिवार दिनांक 3 फेब्रुवारी रोजी नांदेड येथील शंकरराव चव्हाण प्रेक्षागृहात आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी त्या बोलत होत्या. यावेळी बोलताना त्यांनी शिक्षकांना आश्वासित करून आपण या जिल्ह्याचे रहिवासी आहात. आपल्या जिल्ह्यातील मुलं अधिक गुणवत्तापूर्ण झाली पाहिजेत यासाठी सर्वांनी विचार करून तो विचार कृतीमध्ये आणला पाहिजे. आपण आपले विद्यार्थी आणि आपली शाळा याप्रती बांधील राहून विद्यार्थ्यांच्या क्षमता लक्षात घेऊन त्यांच्यासाठी स्वतः नाविन्यपूर्ण प्रयोग राबवावेत असे सांगून यावेळी नंदुरबार जिल्ह्यात राबविलेल्या शैक्षणिक प्रयोगांची माहिती ही त्यांनी यावेळी दिली.
आपण केलेल्या कामाचे हे उदाहरण देश पातळीवर सादर करू. हा नवा आदर्श राष्ट्रीय सिद्धतेचा करू. नंदुरबारला 15 ते 20 शिक्षकांनी मेहनत घेतली आणि तो उपक्रम राज्यस्तरावर मानांकित झाला. मेहनत व कृती केल्या तर निश्चितच यश मिळेल आणि नांदेड जिल्ह्यातील सर्व शिक्षक प्रयत्न करतील, अशी आशा मुख्य कार्यकारी अधिकारी मीनल करनवाल यांनी व्यक्त केली.
मंचावर प्राथमिकच्या शिक्षणाधिकारी डॉ. सविता बिरगे, माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, आळणे यांची प्रमुख उपस्थिती होती. कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. सविता बिरगे यांनी केले. माध्यमिकचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर यांनी असरच्या अहवालातील नांदेड जिल्ह्याचे स्थान या विषयावर सादरीकरण केले. यावेळी गुणवत्ता विकासाचे राज्य साधन व्यक्ती निलेश घुगे यांनी शिक्षकांशी संवाद चर्चा केली.
दिवसभर चाललेल्या या चर्चासत्रात काही शिक्षकांनी आपल्या शाळेमध्ये राबवीत असलेल्या गुणवत्ता विकासाच्या कार्यक्रमाचे भविष्य विधी शिक्षणाचे नव-नवे प्रयोग मांडले. विद्यार्थ्यांचा सकारात्मक प्रतिसाद कसा मिळत आहे या विषयावर भाष्य केले. भविष्यवेधी प्रशिक्षण हे निश्चितच मुलांसाठी उपयुक्त ठरणार असल्याचे मत शिक्षकांनी व्यक्त केले. शिक्षकांच्या प्रश्नांना निलेश घुगे आणि शिक्षकांमधीलच सुलभकांनी उत्तरे दिली विचारांच्या आदान-प्रदानाचे हे सत्र लक्षणीय ठरले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ. विलास ढवळे यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी उप शिक्षणाधिकारी बंडू अमदुरकर , माध्यमिकचे उप शिक्षणाधिकारी पाचंगे, शिक्षण विस्तार अधिकारी शिवाजी नाईकवाडे आदींनी परिश्रम घेतले.