हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पिक विमा तात्काळ द्या ; हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांनी कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे केली मागणी
मुंबई/नांदेड/हिमायतनगर। हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांचा थकलेला पीकविमा तात्काळ मिळावा..! खासदार हेमंत पाटील यांच्या मागणीचा विचार करत मुंबईतील सहयाद्री अतिथीगृह येथे कृषी मंत्री धनंजय मुंडे यांच्या उपस्थितीत बैठक संपन्न झाली या बैठकीत शेतकऱ्यांना तात्काळ पिक विमा देण्याचा निर्णय झाला, हिंगोली जिल्हयात झालेल्या चुकीच्या सर्व्हेमुळे विम्याची रक्कम मिळाली नव्हती.
हिंगोली जिल्ह्यातील लोकसभा क्षेत्रातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळावा अशी वारंवार शेतकऱ्यांकडुन मागणी केली जात होती, हा विषय खासदार हेमंत पाटील यांनी नेटाने लावुन धरत शेतकऱ्यांना न्याय मिळवून देण्यासाठी मुंबई पर्यंत नेला.
हिंगोली जिल्ह्याचा चुकीचा पीक कापणी अहवाल संबंधित विभागाने सादर केल्यामुळे जिल्हा कृषी अधीक्षक शिवराज घोरपडे यांची चौकशी करण्यात यावी अशी मागणी करत, हदगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचा युनाइटेड इंडिया इन्शुरन्स कंपनीकडे सन २०२२ चा थकलेला पीकविमा मिळावा या व अन्य शेतकरी हिताच्या विषयावर चर्चा करण्यात येवुन निर्णय घेण्यात आला.
मुंबई येथे सहयाद्री अतिथीगृहावर राज्याचे कृषिमंत्री मा.धनंजय मुंडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडली. बैठकीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील शेतकऱ्यांच्या हिताच्या दृष्टीने मांडलेल्या प्रश्नाबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली व तात्काळ कारवाई करण्याचे आदेश कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी दिले.
या बैठकीला राज्याचे रोजगार हमी व फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, हिंगोली लोकसभेचे लोकप्रिय खासदार हेमंतभाऊ पाटील, आमदार तानाजीराव मुटकुळे, माजी खासदार ऍड.शिवाजीराव माने, शिवसेना नांदेड जिल्हाप्रमुख बाबुराव कदम कोहळीकर, सहसचिव गणेश पाटील कृषी संचालक दिलीप झेंडे, कृषी सहसंचालक विजयकुमार आवटे, जिल्हाकृषी अधीक्षक नांदेड, व्यंकटेश पाटील, राजू कदम, संदीप पाळकर, गजानन शिंदे, आत्माराम पाटील, यांच्यासह आदी उपस्थित होते.