हिमायतनगर,अनिल मादसवार| स्वर्णिम भारत की पहचान..आत्मनिर्भर हो किसान या मार्गदर्शन शिबिराला नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर शहर व परिसरातील शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद लाभला आहे. या व्यासपीठावरून राजयोगी ब्रह्माकुमार राजू भाईजी, उपाध्यक्ष, कृषी व ग्रामविकास विभाग, ब्रह्मकुमारी व राजयोगिनी ब्रह्माकुमारी सुनंदा बहेनजी, राष्ट्रीय समन्वयक, कृषी व ग्रामविकास विभाग, ब्रह्माकुमारी यांनी उपस्थित शेतकऱ्यांना सेंद्रिय शेती करून मरणासन्न मातृभूमीला वाचवण्यासाठी प्रोत्साहित केले. तसेच सेंद्रिय शेतीच्या माध्यमातून स्वत:ला निरोगी बनवण्याचा संकल्प करावा. अशी विनंती मार्गदर्शन करताना करण्यात आली. यावेळी व्यासपीठावर पुणे, कोल्हापूर, हैद्राबाद, नांदेड, नायगाव, हिमायतनगर व दूरवरचे मान्यवर व प्रतिष्ठित शेतकरी उपस्थित होते.
पुढे बोलतांना राजू भाईजी म्हणाले की, शाश्वत योगिक शेतीसाठी शेतकऱ्यांनी देशी शेती पद्धतीचा वापर कसा करता येईल. प्रदूषणमुक्त, आरोग्यदायी उत्पादन व दर्जेदार अन्नपदार्थ कमी खर्चात कसे मिळवता येतील आणि मातृभूमीला पुन्हा निरोगी बनवून त्याचे पुनरुज्जीवन कसे करता येईल. यासाठी सर्व शेतकऱ्यांना आमच्याकडून मोफत मार्गदर्शन केले जाईल, त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी सेंद्रिय शेतीसाठी पुढे येण्याची गरज आहे. यासाठी भारतातील शेतकऱ्यांनी देशी गायीचे संगोपन करणे गरजेचे आहे. अन्नदाता असलेला आपला शेतकरी कोणत्या ना कोणत्या कारणाने आत्महत्या करतो.. हे आपण ऐकतो पाहतो आहे… जो प्रत्येकासाठी अन्न तयार करतो आणि प्रत्येकाच पोट भरतो तो कोणत्या ना कोणत्या ओझ्याखाली दबले जात आहेत, त्यामुळे त्यांना असे टोकाचे पाऊल उचलावे लागते आहे.
भारतातील या सर्व शेतकर्यांना या समस्येतून बाहेर काढण्यासाठी… सेंद्रिय शेतीत शुद्ध आणि पवित्र मनाने परिश्रम करून भारताला एक आदर्श आणि जागतिक नागरिक बनवण्यासाठी आपण त्यांना साथ देणे गरजेचे आहे. तरच आपला देश भारत पुन्हा महान होईल… विषमुक्त अन्नाचे उत्पादन केल्यास अनावश्यक खर्चात बचत होईल… शेतकऱ्यांचा दर्जा वाढेल… मन स्वस्त आणि निरोगी राहील… त्यामुळे शेतकऱ्यांवर आत्महत्या करण्याची वेळ येणार नाही. या नैसर्गिक आणि प्राचीन विषमुक्त शाश्वत शेतीमुळे पर्यावरणीय असंतुलन आणि आपल्या आरोग्याच्या समस्यांना आळा घालण्यात आपण नक्कीच यशस्वी होऊ, असे राजयोगी ब्रह्मकुमार राजू भाईजी यांनी सांगितले.
यावेळी हिमायतनगर तालुक्यातील सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांचे स्वागत करण्यात आले. यासोबत लहान बाल्कनी सेंद्रिय शेतीचे फलित यावर आधारित गीत आणि जय श्री राम हे गीत सादर करून उपस्थितांची मने जिंकली. या कार्यक्रमाच सूत्रसंचालन सोनल बहन यांनी केलं तर शीतल दीदी यांनी उपस्थितांचे आभार मानले. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शीतल दीदी, सिंधू दीदी व ओम शांती सेंटरच्या सर्व सहकाऱ्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमासाठी अनेक मान्यवर, महैला पुरुष नागरिक शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित झाली होती.