नांदेड। राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवारांच्या गटाला सोडून पक्षाच्या उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर नागापूरकर यांनीही राष्ट्रवादीच्या अजित पवार गटात नुकताच प्रवेश केला असून त्यांच्यावर पक्षसंघटनेत लवकरच मोठी जबाबदारी येण्याचे संकेत आहेत.
राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्यापासून दूर होत अजित पवार यांनी पक्षातील अनेक आमदार-खासदारांना सोबत घेऊन राज्यातील शिंदे- फडणवीस सरकारमध्ये सामील झाल्यानंतर आता आपणच मूळ राष्ट्रवादी असल्याचे सांगून पक्षसंघटना विस्तारावर लक्ष दिल्याने नांदेड जिल्ह्य़ातील बहुतांश पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्ते त्यांच्या गटात प्रवेश घेत असून त्यात पक्षाच्या उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष श्रीधर नागापूरकर यांचीही भर पडली आहे.
त्यांनी सुभाष मालपानी यांच्या माध्यमातून राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांची त्यांच्या मुंबई येथिल देवगिरी निवासस्थानी नुकतीच भेट घेऊन त्यांच्या राष्ट्रवादी गटात प्रवेश केला यावेळी पक्षाचे राष्ट्रीय सचिव अविनाश आदिक, प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे यांचीही प्रमुख उपस्थिती होती. त्यांच्यासह पक्षाचे प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे यांनाही नागापूरकर यांनी राष्ट्रवादीच्या पक्ष संघटन वाढीसाठी गत १४ वर्षामध्ये स्थानिक पातळीवर केलेला कार्य अहवाल सादर केला.
तसेच,पक्षाच्या उद्योग व व्यापार आघाडीच्या माध्यमातूनही स्थानिक व्यापारी वर्गांशी समन्वय साधून त्यांच्या वेळोवेळी निर्माण झालेल्या अडचणी निवारणासाठी केलेल्या प्रयत्नांची माहिती दिल्यानंतर त्यांना या गटात प्रवेश देऊन यापूढे आपल्या पक्षाच्या वाढीसाठी प्रयत्न करावेत असे सांगून उपमुख्यमंत्री ना.पवार यांनी लवकरच पक्षसंघटनेत महत्वाची जबाबदारी देणार असल्याचे संकेत दिल्याचे समजते.
नागापूरकर यांच्याकडे पूर्विच्या एकसंघ तसेच,राष्ट्रवादीचे संस्थापक अध्यक्ष खा.शरदचंद्र पवार यांच्या गटाचे पक्षाचे उद्योग व व्यापार आघाडीचे जिल्हाध्यक्ष त्याचबरोबर,पक्षाचे शहर जिल्हा प्रवक्ता आणि पक्षाच्या नगरपालिका व नगरपरिषद कामगार,कर्मचारी आघाडीचेही जिल्हाध्यक्षपद होते.अनेक पदे असली तरिही त्यांनी आपल्या प्रत्येक पदांना न्याय देण्याचा प्रयत्न करित पक्ष संघटन वाढीला सातत्याने प्राधान्य दिलेले असतांना अचानकपणे या गटाला दिलेली सोडचिठ्ठीची चांगलीच चर्चा होत असून अजित पवारांच्या गटात लवकरच त्यांना पक्षाच्या उद्योग व व्यापार आघाडीच्या प्रदेश वा मराठवाडा विभागाच्या कार्यकारिणीत महत्वाची जबाबदारी मिळण्याची शक्यता आहे.
दरम्यान राज्याचे उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार,प्रदेशाध्यक्ष खा.सुनील तटकरे,मंत्री ना.हसन मुश्रीफ व सुभाष मालपाणी यांच्या खंबिर नेतृत्वात तसेच, पक्षाचे दक्षिण जिल्हाध्यक्ष दिलीपराव धर्माधिकारी,उत्तर जिल्हाध्यक्ष विश्वांभर पवार,शहर जिल्हाध्यक्ष जीवन पाटील घोगरे यांच्याशी समन्वय साधून भविष्यातही पक्ष संघटनवाढीसाठी प्रयत्नशील राहणार असल्याची ग्वाही श्रीधर नागापूरकर यांनी आमच्या प्रतिनिधीशी बोलतांना दिली.