नांदेड। वाढती महागाई ,बेरोजगारी यामुळे जनतात्रस्त झाली आहे. त्यांचा विश्वास काँग्रेसच्या गँरंटीवर आहे. यामुळे आगामी काळात परिवर्तन अटळ आहे. काँग्रेस पदाधिकारी ,कार्यकर्त्यांनी ताकदीने सांघिक पणे लढल्यास हिंगोली व नांदेडच्या लोकसभा जागेसह विधानसभा निवडणुकीत सुध्दा काँग्रेसच जिंकेल असा विश्वास राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
शहरातील नवामोंढा येथील काँग्रेस पक्ष कार्यालयात शुक्रवार दि. 5 जानेवारी रोजी हिंगोली जिल्हयातील सामाजिक क्षेत्रात काम करणारे दिग्गज नेते विराट राष्ट्रीय लोकमंच काउंसिल या सामाजिक संस्थेचे अध्यक्ष शे. नइम शे. लालसाब यांच्या नेतृत्वात शेकडो जणांनी माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांच्या उपस्थितीत काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या पक्ष प्रवेश सोहळ्यामुळे काँग्रेसची ताकद अधिकच वाढली आहे. यावेळी हिंगोलीचे माजी आ.भाऊसाहेब गोरेगावकर,काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष माजी आ. अमरनाथ राजूरकर ,माजी आ. हणमंतराव बेटमोगरेकर ,माजी आ. ओमप्रकाश पोकर्णा ,माजी उपमहापौर शमीम अब्दुला ,हिंगोली काँग्रेस जिल्हाध्यक्ष दिलीप देसाई,डॉ. अंकुश देवसरकर ,प्रिती जैस्वाल आदींची उपस्थिती होती.
यावेळी पुढे बोलतांना माजी मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण म्हणाले की , शे.नइम शे.लालसाब यांच्या नेतृत्वात शेकडो जणांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला असल्याने हिंगोलीत काँग्रेस पक्षाची ताकद आणखी वाढेल. आता सर्वानी मतदारांपर्यंत पोहचत त्यांचे मत काँग्रेसच्या पारड्यात पडेल यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. निवडणुकीच्या तोंडावर महागाई ,बेरोजगारी अशा जनतेच्या प्रश्नांवरील लक्ष अन्यत्र वळवण्यासाठी राम मंदिर ,चांद्रयान ,जी 20 शिखर परिषद आदी मुद्दे उपस्थित करीत विकासाचा खोटा दावा भाजपा कडून करण्यात येईल . अशा वेळी सध्याची परिस्थिती ,शेतकरी आत्महत्या , महागाई ,बेरोजगारी असे प्रश्न जनतेत मांडणे आवश्यक आहे. भारत जोडो यात्रेच्या माध्यमातून पक्षासाठी पोषक वातावरण तयार झाले आता काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रेचाही पक्षाला लाभ होणार आहे.
काँग्रेसच्या गँरंटीवर तेलंगणा वासियांनी विश्वास दाखवला तोच विश्वास येथील मतदार आपणावरही दाखवतील यासाठी यापुढे महाविकास आघाडीचे अधिकाधिक उमेदवार विजयी व्हावेत यासाठी प्रयत्न करा असे आवाहन अशोकराव चव्हाण यांनी केले. यावेळी माजी आ. भाऊराव पाटील गोरेगांवकर ,शे. नइम शे. लालसाब यांनी मनोगत व्यक्त केले . या काँग्रेस पक्ष प्रवेश सोहळ्यास हिंगोलीच्या पदाधिकारी ,कार्यकर्ते व शे. लालसाब यांच्या समर्थकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.