संगम महोत्सवासाठी ग्रामपंचायतचा प्रस्ताव येताच निर्णय घेण्यात येईल.- जिल्हाधिकारी राऊत
नांदेड। जिल्ह्यातील देगलूर तालुक्यातील होट्टल प्रमाणे धर्माबाद तालुक्यातील संगम येथे “संगम महोत्सव” साजरा करण्याच्या अनुषंगाने मागणी रास्त आहे. मात्र संगम ग्रामपंचायतीचा प्रस्ताव आल्यावर लवकरच त्याबाबत योग्य ते निर्णय घेण्यात येईल. अशी माहिती जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी दिली. ते मंगळवारी प्रश्न सीमावर्ती भागाचे …!या अनुषंगाने आढावा बैठकीत बोलत होते. यावेळी विविध विभागाचे अधिकारी यासह प्रश्न सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक गोविंद मुंडकर यांची विशेष उपस्थिती होती.
मंगळवार दिनांक 2 जानेवारी 2024 रोजी सायंकाळी साडेचार वाजता घेण्यात आलेल्या बैठकीत जिल्हाधिकारी श्री अभिजीत राऊत पुढे म्हणाले की, धर्माबाद आणि बासर जाणारा बिलोलीतील रस्ता सार्वजनिक बांधकाम विभागाने अडथळे दूर करण्यासाठी पुढाकार घेऊन गतीने पूर्ण करावा. या भागातील रस्त्यांच्या कामांना प्राधान्यक्रम देण्यात यावे. लवकरच होट्टल महोत्सव घेण्यात येणार आहे. त्यामुळे परमेश्वर मंदिर परिसरातील रस्त्यांचे काम गतीने पूर्ण करण्यात यावेत. अशा सूचना सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
देगलूर तालुक्यातील हो ट्ट ल येथील परमेश्वर मंदिराजवळ आणि शिव मंदिराजवळ विजेची व्यवस्था व्यवस्थित करण्यासाठी वीज वितरण कंपनीने यथायोग्य पाऊले उचलावीत असे सुचविण्यात आले. बिलोली, देगलूर, धर्माबाद तालुक्यातील सीमा भागातील जिल्हा परिषद हायस्कूल आणि जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या सोयी- सुविधा विषयी आढावा घेण्यात आला.
गंजगाव, कारला बु. , बावलगाव आणि हिप्परगा आदी ठिकाणी ज्या शाळा उत्तम कार्यरत आहेत त्यांना प्रशासनाच्यावतीने गौरव करण्यात येणार आहे. शिक्षण विभाग यांच्या पुढाकाराने हा कार्यक्रम आखण्यात यावा अशा सूचना जिल्हाधिकारी श्रीयुत राऊत यांनी केल्या. बिलोली, देगलूर, धर्माबाद या तीन तालुक्यातील रस्ते, वीज आणि शिक्षणाच्या अडचणी आणि उपाय यावर सीमावर्ती भागाचे प्रमुख समन्वयक श्री गोविंद मुंडकर यांनी सविस्तर मांडणी केली. पुढील बैठकीत प्रारंभी विकासाच्या संकल्पना आणि त्यावरील आराखडा तदनंतरच त्यावर बैठक घेण्याचे ठरले. या बैठकीस बिलोली, देगलूर, धर्माबाद तालुक्यातील सार्वजनिक बांधकाम, शिक्षण, पाटबंधारे, तसेच वीज वितरण कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.