महापालिकेच्या वतीने पूरग्रस्तांची त्रुटीतील दुसरी यादी तहसील कार्यालयास सादर
नांदेड| दि.२६-२७ जुलै रोजी नांदेड शहरातील अतिवृष्टी मध्ये नुकसान झालेल्या नागरिकांना नुकसान भरपाई आणि रेशन रेशन किट मिळावी म्हणून सीटू संलग्न नांदेड जिल्हा मजदूर युनियन च्या वतीने सातत्याने पाठपुरावा व आंदोलने करून सानुग्रह अनुदान निधी मंजूर करण्यास शासनाला भाग पाडले आहे.
दसऱ्याच्या पुर्व संध्येला नांदेड उत्तर मतदार संघाचे आमदार बालाजी कल्याणकर यांनी महापालिका आयुक्त,तहसीलदार नांदेड आणि इतर काही अधिकाऱ्यांना सोबत घेऊन चेक वाटप करून पूरग्रस्तांना दिलासा देणारा कार्यक्रम चालू केला होता. परंतु अनेक पूरग्रस्त या पात्र यादी मधून वगळण्यात आले होते. त्या राहिलेल्या खऱ्या पूरग्रस्तांना अनुदान देण्यात यावे आणि रेशन किट मिळावी म्हणून सीटू कामगार संघटनेने नांदेड शहरातील संबंधित कार्यालया समोर विविध १५ प्रकारची आंदोलने केली. दि.२० पासून २९ डिसेंबर पर्यंत माकपचे महापालिकेच्या मुख्य प्रवेश द्वारा समोर सामूहिक साखळी उपोषण सुरु असून एकूण आंदोलनाचे ७८ दिवस पूर्ण होत आहेत.
आणि या आशयाच्या बातम्या प्रसार माध्यमातून प्रसिद्ध झाल्यामुळे उदासीन असलेल्या जिल्हा प्रशासनाने दि.२९ रोजी त्रुटीची दुसरी यादी तहसील कार्यायलय,नांदेड यांना पाठविण्यात आल्याचे लेखी पत्र माकप सचिव कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे आणि कॉ.सोनाजी कांबळे आदींच्या नावे मनपा आपत्ती विभागाचे उपायुक्त डॉ.पंजाबराव खानसोळे यांनी काढले आहे.त्या पत्रात शहरातील ८७ टक्के अनुदान वितरणाचे काम पूर्ण झाले असून त्रुटी अभावी काही नुकसान ग्रस्तांचे निधीचे वितरण प्रलंबीत आहे.असे लेखी स्वरूपात कळविले आहे. आणि महापालिके समोर सुरु असलेले उपोषण मागे घेऊन सहकार्य करावे अशी विनंती केली आहे.
आयुक्त,उपायुक्त आणि आपत्ती व्यवस्थापण अधिकारी यांनी उपोषणाची दखल घेतल्यामुळे माकप कार्यकर्त्यांनी समाधान व्यक्त केले असून राहिलेले १३ टक्के नागरिकांचे अनुदान लवकर बँक खात्यात वर्ग करावे आणि तहसीलदार नांदेड यांनी अधिकृतपणे यादी प्रसिद्ध करावी ह्या मागण्या घेऊन मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष – माले आणि राष्ट्रीय संविधान बचाव अभियानचे कॉ.दिगांबर घायाळे आणि प्रा.देविदास इंगळे यांनी दि.२६ डिसेंबर रोजी जिल्हा प्रशासनास नोटीस दिली असून तहसील कार्यालया समोर बेमुदत उपोषण करण्याचा इशारा दिला आहे. महापालिके समोरील उपोषण आज संपण्याची चिन्हे असून पुढील मोर्चा तहसील कार्यालयावर असणार आहे. या यशस्वी आंदोलनात कॉ.गंगाधर गायकवाड, कॉ.उज्वला पडलवार, कॉ.करवंदा गायकवाड, कॉ.लता गायकवाड, कॉ.मारोती केंद्रे, कॉ. सोनाजी कांबळे, कॉ. राजेश दाढेल,कॉ.अविनाश कांबळे,संतोष शिंदे,प्रदीप सोनाळे,शरद रणवीर आदींनी परिश्रम घेतले असून माकप चे राज्य सचिव मंडळ सदस्य तथा मराठवाड्याचे नेते कॉ.विजय गाभने यांनी मार्गदर्शन केले.