जगद्गुरु श्री मध्वाचार्य मूल महासंस्थानांतर्गत, श्री उत्तरादि मठाचे पीठाधिपती, श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामीजींचे दि. २७ व २८ डिसेंबर या काळात नांदेडमध्ये वास्तव्य आहे. त्यांचा संक्षिप्त परिचय करून देणारा हा लेख वाचकांसाठी येथे देत आहोत.
श्री सत्यात्मतीर्थ स्वामी जगद्गुरु श्री मध्वाचार्य मूल महासंस्थान, श्री उत्तरादि मठाच्या यती परंपरेतील, श्री श्री १००८ श्री सत्यात्मतीर्थ स्वामी, ४२ वे संन्यासी आहेत. ३ नोव्हेंबर १९९७ ला श्री सत्यात्मतीर्थ यांनी श्री सत्यप्रमोदतीर्थ स्वामींकडून, संस्थानाची सूत्रे हातात घेतली. श्री मध्वाचार्यांच्या द्वैत सिद्धांताचा विचार सर्वदूर प्रस्थापित करून सर्वांना भक्तीमार्गावर घेऊन जाण्याचे काम श्री स्वामीजी सातत्याने करीत आहेत.
असामान्य बुद्धिमत्ता, पराकोटीचे ज्ञान, भक्तोद्धारक व निस्सीम गुरुभक्ती, याशिवाय इतर अनेक सद्गुणांनी श्री स्वामी परिपूर्ण आहेत. त्यांचे पूर्वाश्रमीचे नाव श्री सर्वज्ञाचार्य गुत्तल. वयाच्या केवळ २३ व्यावर्षी ते सन्यासाश्रमात प्रविष्ठ झाले. श्री सत्यध्यान विद्यापीठाचे संस्थापक पं. गोपालाचार्य माहुली व पं. विद्यासिंहाचार्य माहुली यांच्याकडे त्यांनी अध्ययन केले. लहान वयातच त्यांच्यातील अचाट बुद्धीमत्ता हा सर्वांच्या कुतूहलाचा विषय होता.
श्री सर्वज्ञाचार्यांनी द्वैत सिध्दांतासह, वेदांत, मीमांसा, शास्त्रे, व्याकरण व इतर साहित्याचा सखोल अभ्यास केला. तमिळ, तेलगू, कन्नड, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांवर त्यांचे प्रभुत्व आहे. त्यांच्या ठायी असलेल्या प्रासादिक वाणी आणि उत्तम वाक्पटुत्वाचं प्रत्यंतर, नेहमीच अनुभवायला मिळते. प्रत्यक्ष ब्रह्मदेवांनी पूजा केलेल्या मूलरामदेव व सीतादेवीच्या मूर्त्यांची दैनंदिन पूजा, १९९७ पासून श्री सत्यात्मतीर्थ स्वामी करीत आहेत. श्री उत्तरादि मठ हा संचार मठ असल्यामुळे श्री स्वामीजी संपूर्ण भारतभर संचार करीत असतात. श्री स्वामीजींच्या काळात महाराष्ट्रासह मध्य व उत्तर भारतात मध्वमताचा लक्षणीय प्रभाव पडत आहे. भारतात सर्वदूर मठाच्या शाखांचा विस्तार होत आहे.
विश्व मध्व महापरिषदेची स्थापना करून श्री स्वामीजींनी मध्वाचार्यांच्या तत्त्वज्ञानाच्या प्रसारासाठी, एक प्रभावी ज्ञानपीठ निर्माण केले आहे. ज्ञानप्रसाराबरोबरच कनवाळू असलेल्या स्वामीजींनी कोविड काळात गोरगरीबांना मठातर्फे मोठ्या प्रमाणावर अन्नदान करून त्यांचीतील मानवतेचे प्रत्यंतर घडवले. श्री स्वामीजींनी अनेक चमत्कार घडवून शरणागतांना जीवनदान व आरोग्य प्रदान केल्याच्या अनेक घटना आहेत. श्री उत्तरादि मठाचे सर्वच यती, श्री मध्वाचार्यांचे अंश अवतार असल्यामुळेच, असे चमत्कार घडू शकतात. अशा अलौकिक व्यक्तिमत्वाच्या श्री स्वामींचे नांदेड नगरीत दि.२७ व २८ डिसेंबरला श्रीनिवास गार्डन मंगल कार्यालय येथे वास्तव्य आहे. त्यांच्या दर्शनाचा लाभ नांदेडकरांनी अवश्य घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
-पं.महिदासाचार्य धर्माधिकारी, व्यवस्थापक श्री उत्तरादि मठ, नांदेड.