
नांदेड, अनिल मादसवार| तुर, हरभरा करपून गेल्याने शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिवस वाढ होत आहे, त्यामुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांकडू चक्क पिकावर नांगर फिरविला जात असल्याची विदारक परिस्थिती नांदेड जिल्ह्यात निर्माण झाली आहे. यातून सावरण्यासाठी हदगाव- हिमायतनगर तालुक्याला दुष्काळग्रस्त जाहीर करून तात्काळ मदतीचा हात द्यावा अशी मागणी शेतकरी वर्गातून केली जात आहे.
नांदेड जिल्ह्यातील हदगाव-हिमायतनगर तालुक्यात सततच्या ढगाळ वातावरणामुळे हाता तोंडाशी आलेले तुरीचे पिके करपून गेली असून, हरभराही करपून गेल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी त्यावर नांगर फिरविला आहे. केवळ वातावरणातील बदलामुळे मोठे नुकसान झाले असून, शेतकऱ्यांच्या आर्थिक संकटात दिवसेंदिवस वाढ होऊ लागली आहे.
खरीप हंगामातील अल्प पावसामुळे कापूस, सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. सोयाबीनचे बीज भरलेले नसल्याने शेतकरी वर्गांना सोयाबीन काढणीत फक्त १ ते २ क्विंटलचा उतारा आला, परिणामी खरीप हंगामात केलेला खर्च निघाला नाही. आता शेतातील कापसाचे आणि तूरीचेही ढगाळ वातावरण आणि धुक्यामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. तुरीला फुलाची लागवड झाली असून, गेल्या आठ ते दहा दिवसांपासून सुरू असलेल्या ढगाळ वातावरणाने फुल गळून किडी-आळीचा प्रादुर्भाव होऊन पुन्हा शेतकरी वर्गाला नुकसानीचा सामना करावा लागत आहे. बहुतांश शेतकऱ्यांच्या शेतातील तुरीचे पीक करपून गेल्यामुळे तुरीचे उत्पादन घटणार आहे.
तर रब्बीमध्ये घेतलेला हरभरा, ज्वारी देखील या अवकाळी पाऊस आणि त्यानंतर निर्माण झालेल्या वातावरणाच्या प्रकोपामुळे नुकसानीत आली असून, हरभरा तर पूर्ण करपून जाऊ लागल्याने अनेक शेतकऱ्यांनी हरभऱ्याच्या पिकावर नांगर फिरविला आहे. शेतीमालाचे नुकसान व कमी भाव मिळत असल्याने शेतकरी दुहेरी संकटात सापडला आहे.
खरीप पिकाने धोका दिल्यानंतर शेतकरी रब्बी पिकाच्या आशेवर होता. अनेक भागातील शेतकऱ्यांनी हरभरा, गहू, ज्वारी, तूर या पिकांचे नुकसान झाले आहे. गेल्या आठवड्याभरापासून जिल्ह्यातल्या वातावरणामध्ये मोठा बदल झाला आहे. हुडहुडी भरणाऱ्या वातावरणामुळे वेगवेगळ्या आजारांनी नागरिक त्रस्त असताना दुसरीकडे पिकांनाही मोठा फटका सहन करावा लागत आहे. शेतकऱ्यांच्या या नुकसानीकडे सरकारने लक्ष देवून शेतकऱ्यांना आर्थिक कोंडीतून सोडविण्यासाठी शासकीय मदत मिळवून देऊन कापूस, सोयाबीन, ज्वारी यासह अन्य पिकांना हमी भाव मिळवून दिलासा द्यावा, अशी मागणी केली जात आहे.
