नांदेडलाईफस्टाईल

कुष्ठरोग व क्षयरोग तपासणीसाठी आरोग्य पथक पोहोचणार घरोघरी – जिल्हाधिकारी अभिजीत राऊत

नांदेड, अनिल मादसवार| समाजात नजरेत न आलेल्या क्षयरोग व कुष्ठरोग याचा प्रसार होवू नये यासाठी वेळीच उपचार महत्वाचा असतो. समाजात असलेल्या या रुग्णांचा शोध घेऊन त्यांच्या मनातील भीती दूर करुन त्यांना उपचाराखाली आणण्यासाठी शासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. बाधित रुग्णांवर उपचार करून या रोगांच्या संक्रमणाची साखळी खंडित करण्यासाठी ही मोहीम 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 या कालावधीत जिल्ह्यात राबविली जाणार आहे. या मोहीमेत घरी येणाऱ्या आरोग्य पथकाद्वारे नागरिकांची तपासणी करण्यात येईल. तपासणीत कुष्ठरोग किंवा क्षयरोगाचे निदान झाल्यानंतर नागरिकांनी या आजारावर मोफत उपचार करून घ्यावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी अभिजीत राऊत यांनी केले. जिल्हा समन्वय समितीची जिल्हाधिकारी कार्यालयात नुकतीच बैठक संपन्न झाली. यावेळी ते बोलत होते.

सहाय्यक संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) विभागाने जिल्हाधिकारी अभिजीत राऊत व जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मिनल करनवाल यांच्या मार्गदर्शनाखाली 2027 पर्यंत नांदेड जिल्हा कुष्ठमुक्त करण्यासाठी धोरणात्मक कृती आराखडा तयार केला आहे. या पुस्तिकेचे विमोचन बैठकीत करण्यात आले. यावेळी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. बालाजी शिंदे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी रेखा काळम, समाजसेवी डॉ. अशोक बेलखोडे, हिंद कुष्ठ निवारण संघचे डॉ.पाटोदेकर, जागतिक आरोग्य संघटनेचे डॉ. अमोल गायकवाड, जिल्हा क्षयरोग अधिकारी प्रतिनिधी डॉ. मिरदोडे, महानगरपालिका आरोग्य अधिकारी डॉ. बिसेन, संचालक आरोग्य सेवा (कुष्ठरोग) डॉ. बालन शेख आदीची उपस्थिती होती.

यावेळी सहाय्यक संचालक डॉ. बालन शेख यांनी या मोहिमेबाबत सादरीकरण करून ही मोहीम 20 नोव्हेंबरपासून 6 डिसेंबर 2023 पर्यंत जिल्ह्यातील ग्रामीण भागात सर्वत्र व शहरी भागात निवडक ठिकाणी होणार असल्याचे सांगितले.या मोहीमेत दोन व्यक्तींचे पथक बनवून ज्यात एक स्त्री आणि एक पुरुष स्वयंसेवक असणार आहेत. हे पथक या काळात घरोघरी भेटी देऊन कुटुंबातील सदस्यांची कुष्ठरोग व क्षयरोगाच्या लक्षणाच्या आधारावर संशयित रुग्णांचा शोध घेऊन नंतर वैद्यकीय अधिकाऱ्यामार्फत निदान निश्चित करून उपचार सुरु करण्यात येणार असल्याचे नमूद केले.

मोहीमेसाठी 2 हजार 669 पथके
क्षयरोगी व कुष्ठरोगी शोध मोहीमेचा कालावधी 20 नोव्हेंबर ते 6 डिसेंबर 2023 असून एकूण 5 लाख 13 हजार 191 घराना आरोग्य पथक भेट देणार आहे. या मोहीमेत एकूण 25 लाख 65 हजार 958 लोकांची तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी आरोग्य विभागाच्यावतीने 2 हजार 669 पथके तयार केली असून या पथकांचे पर्यवेक्षण करण्यासाठी 534 पर्यवेक्षकांची नियुक्ती केली आहे.

संशयित कुष्ठरोगाची ही आहेत लक्षणे
त्वचेवर फिकट/लालसर बधीर चट्टा, त्याठिकाणी घाम न येणे, जाड बधीर तेलकट चकाकणारी त्वचा, त्वचेवर गाठी असणे, कानाच्या पाळया जाड होणे, भुवयाचे केस विरळ होणे, डोळे पूर्ण बंद करता न येणे, तळहातावर, तळपायावर मुंग्या येणे, बधिरता येणे, जखमा असणे, हातापायाची बोटे वाकडी होणे, हात मनगटापासून किंवा पाय घोटयापासून लुळा पडणे,त्वचेवर गरम आणि थंड याची संवेदना नसणे, हात, पायात अशक्तपणा जाणवणे, हातातून वस्तू गळून पडणे, चालताना पायातून चप्पल गळून पडणे.

क्षयरोगाची ही आहेत लक्षणे
दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा खोकला, दोन आठवड्यापेक्षा जास्त कालावधीचा ताप, वजनात लक्षणीय घट, भूक मंदावणे, थुंकीवाटे रक्त पडणे, मानेवर गाठी येणे.

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!