आर्टिकल

मराठवाड्यात रेल्वेमार्गांचे १००% विद्युतीकरण

दक्षिण मध्य रेल्वे विभागातील रेल्वेमार्गाचे संपूर्ण म्हणजेच शंभर टक्के विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. मराठवाड्यातील प्रलंबित ११६ किलोमीटरचे अंतर नुकतेच विद्युतीकरणाला जोडण्यात आले आहे .यामुळे संपूर्ण मराठवाडा आता इलेक्ट्रिफिकेशन झाला आहे . यामुळे मराठवाड्याचा रेल्वेचा भाग दक्षिण, उत्तर व मध्य भारताशी जोडला जाणार आहे. मराठवाड्यातील रेल्वे मार्गाचे संपूर्ण विद्युतीकरण झाले असल्यामुळे इंधनाची ५०% बचत होणार आहे. तसेच रेल्वेची संख्या व वेग वाढणार असून त्याचा फायदा प्रवाशांसह रेल्वे विभागालाही होणार आहे. अंकई ते मुदखेड- मिरखेल-मालटेकडी या रेल्वे मार्गाचे काम २०२० पासून सुरू होते. दक्षिण मध्य रेल्वे अंतर्गत प्रलंबित असलेल्या एकूण ३५२ किलोमीटर रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण पूर्ण झाले असून यासाठी ६२४ कोटी रुपयांचा खर्च आला आहे. आंध्र प्रदेश, तेलंगणा, मराठवाडा, विदर्भ व गुजरात या मार्गाला मराठवाडा रेल्वे विभाग आता विद्युतीकरणासह जोडला जाणार आहे. विशेष म्हणजे यामुळे डिझेलची खूप मोठी बचत होणार आहे.

नांदेड डिव्हिजन अंतर्गत रेल्वे मार्गाचे विद्युतीकरण प्रलंबित होते . त्यामुळे रेल्वेची गती आपोआप कमी होती. वारंवार इलेक्ट्रिफीकेशन रेल्वे मार्गाची मागणी जोर धरत होती. डिझेलच्या इंजिनचा रेल्वेमार्ग यामुळे रेल्वेची गती व इंधन या दोन बाबींमुळे प्रवासासाठी वेळ लागत होता.‌ तो वेळ आता कमी होणार असून रेल्वेचा वेगही वाढणार असल्याने त्याचा फायदा प्रवासी वर्गाला होणार आहे. पश्चिम व दक्षिण भागाला जोडण्यासाठी मराठवाडा विभागातील विद्युतीकरण अतिशय गरजेचे होते. भारताची आर्थिक राजधानी मुंबई ,तेलंगणाची राजधानी हैदराबाद, कर्नाटकची राजधानी बंगळुरू व चेन्नई याबरोबरच पूर्वेला नागपूर व बिलासपूर या महत्त्वाच्या रेल्वेमार्गाला हा विद्युतीकरणाचा मार्ग जोडल्या गेला आहे. त्यामुळे मराठवाड्यातील प्रवासी या संपूर्ण देशातील महत्त्वाच्या गावांना कमी वेळेत व जास्त गतीने पोहोचणार आहे. मराठवाड्यातील प्रलंबित विद्युतीकरण कामाची निविदा २०१५-१६ मध्ये काढण्यात आली होती.

८८३ किलोमीटर रेल्वे मार्गासाठी ८६५ कोटी रुपयांची ही निविदा होती. तेव्हापासून दक्षिण मध्य रेल्वे विभागाअंतर्गत प्रलंबित रेल्वे मार्गाचे दुहेरीकरण व विद्युतीकरणाचे काम सुरू होते. मराठवाड्यात ज्या भागाचे विद्युतीकरण पूर्ण झाले त्या ठिकाणी दोन दिवसापूर्वी ट्रायल घेण्यात आले. हे ट्रायल यशस्वी झाले असून आता दक्षिण मध्य रेल्वे विभागाचे पीसीईई यांच्याकडून अंतिम परवानगी पत्र प्राप्त होताच या मार्गावर थेट इलेक्ट्रिक रेल्वे धावणार आहेत. मराठवाड्यातून डिझेलचे रेल्वे इंजिन हद्दपार होणार असून ही मराठवाडा वासियांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे. यामुळे मराठवाड्यातील दळणवळणाचे महत्त्वाचे साधन असलेली रेल्वे येथील उद्योग व व्यापार वाढीसाठी ही महत्त्वपूर्ण ठरणार आहे. परभणी ते मनमाड या रेल्वे लाईनचे दुहेरीकरण झाल्यानंतर त्या ठिकाणी विद्युतीकरण पूर्ण करणे गरजेचे होते , हे कामही पार पडले असल्याने रेल्वे मार्ग दुहेरीकरण होऊन त्याचे विद्युतीकरणही पूर्ण झाले आहे.गेल्या कित्येक दशकांची ही मागणी मार्गी लागली असल्याने मराठवाडा आता पूर्वीपेक्षा अधिक गतीने प्रगतीपथावर येईल अशी अपेक्षा आहे. दक्षिण मध्य रेल्वे विभागातील तेलंगणा राज्यातील सिकंदराबाद ते महाराष्ट्रातील मनमाड या मार्गावरील विद्युतीकरण शंभर टक्के झाले असल्याने आता दूरच्या मार्गाने धावणाऱ्या रेल्वे या जवळच्या मार्गावरून धावणार आहेत.

त्याचा फायदा महाराष्ट्र, तेलंगणा , आंध्र प्रदेश , कर्नाटक , गुजरात या राज्यातील प्रवाशांना होणार आहे. तसेच आता या मार्गावर रेल्वेची संख्या देखील वाढणार आहे. भविष्यात मराठवाड्यात विकासाचा मोठा वाव असल्याने बाहेर राज्यातील अनेक मोठ्या कंपन्या तसेच रोजगाराच्या संधी मराठवाड्यात यामुळे उपलब्ध होणार आहेत. दोन महिन्यांपूर्वी मराठवाड्यातील लातूर येथे वंदे भारत रेल्वेसाठी डबे तयार करणाऱ्या कारखान्याचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. तेव्हापासून मराठवाडा हा देश पातळीवर रेल्वेच्या नकाशावर चमकले होते. मराठवाड्यात रेल्वे विभागाची खूप मोठी जागा आहे. आता या मार्गाचे संपूर्ण शंभर टक्के विद्युतीकरण झाले असल्यामुळे भविष्यात रेल्वे विभागाला एखादा मोठा कारखाना सुरू करावयाचा असेल तर त्यासाठी लागणारी गरज मराठवाड्यातून भागणार आहे. मराठवाडा हा अनेक राज्यांसाठी मध्यभागी असल्याने त्याचा फायदा रेल्वे विभागाला होऊ शकतो. या दृष्टीने रेल्वे विभागाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष देणे गरजेचे आहे. यासाठी मराठवाडा रेल्वे परिषद दिल्ली दरबारी प्रयत्न करणार असल्याचे सांगण्यात आले.

मराठवाड्यातील रेल्वे विषयांचा गाढा अभ्यास असणारे कै. सुधाकरराव डोईफोडे यांनी मराठवाड्यातील प्रलंबित रेल्वे प्रश्न तसेच रेल्वे मार्गांचे दुहेरीकरण व विद्युतीकरण पूर्ण व्हावे यासाठी खूप मोठा पाठपुरावा केला होता. त्यांच्या पाठपुराव्याला अखेर २०२४ मध्ये पूर्ण यश आले आहे . मराठवाडा रेल्वे परिषदेने देखील यासाठी दिल्ली दरबारी तसेच रेल्वे मंत्र्यांकडे वारंवार पाठपुरावा केल्यामुळे अखेर मराठवाड्याला हे सोन्याचे दिवस आले आहेत.

….डॉ. अभयकुमार दांडगे, मराठवाडा विशेष, abhaydandage@gmail.com

NewsFlash360 Staff

पाठको के लिये विशेष सूचना यदि इस समाचार चैनल/पोर्टल पर प्रकाशित समाचार की नकल की जाती है तो संबंधित संगठन, व्यक्ति कॉपीराइट कानून के अनुसार उत्तरदायी होंगे। कोई समाचार चैनल किसी समाचार वेबसाइट पर प्रकाशित विज्ञापनों, समाचारों, लेखों या सामग्री की समीक्षा नहीं कर सकता है। इसलिए हो सकता है कि निर्देशक/संपादक इससे सहमत न हों। इससे उत्पन्न होने वाले किसी भी मामले के लिए संबंधित लेखक, संवाददाता, प्रतिनिधि और विज्ञापनदाता पूरी तरह जिम्मेदार होंगे। इस वेबसाइट पर प्रकाशित समाचार या सामग्री के संबंध में उत्पन्न होने वाला कोई भी विवाद हिमायतनगर न्यायालयों के अधीन होगा।

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
error: Content is protected !!